Monday 25 August 2014

१०० वर्षे टिकणाऱ्या इमारती....



१०० वर्षे टिकणाऱ्या इमारती....

१०० वर्षांपेक्षा जास्त काळ टिकणाऱ्या इमारती
मुंबईतील खाऱ्या हवेत बांधता येतील का?
या प्रश्नाचे उत्तर..  “होय आहे.



                मुंबईकर व विशेषत: समुद्र किनाऱ्यानजीकच्या रहिवाश्यांनी समुद्राच्या खाऱ्या हवेची विनाकारण फार धास्ती  घेतली आहे.
                माझा ३१ वर्षांचा बांधकाम क्षेत्रातील सर्वांगीण अभ्यास असून बांधकामशास्त्र संबंधित सात पेटंट्स प्रोसेसमध्ये आहेत.
                या पार्श्वभूमीवर बांधकामक्षेत्राबाबत विशेष माहिती नसलेल्या व्यक्ती माझ्याबरोबर इमारतींच्या आयुष्याबद्दल बोलतांना सहज बोलतात कि मुंबईतील समुद्राच्या खारट हवेमुळे इमारतींचे आयुष्य ४०-४५ वर्षे असणे हे साहजिक आहे. पण हा त्यांचा फार मोठ्ठा गैरसमज आहे.
                यासाठी उदाहरणे म्हणून ते समुद्राच्या खारट हवेने गंजलेला गाड्यांचा व फ्रिजचा पत्रा, फॅब्रीकेशन ग्रील वगैरे अनेकानेक लोखंडी वस्तू-गोष्टी यांची उदाहरणे देतात.
                मुंबईमध्ये या सर्व लोखंडी वस्तू समुद्रावरून येणाऱ्या खारट हवेने लवकर गंजतात हे जरी खरे असले तरी बांधकामातील लोखंडी बार्स/सळ्या या गाडी, फ्रिज वा ग्रीलप्रमाणे फक्त साध्या पेंटच्या पातळ आवरणाने आच्छादित अवस्थेमध्ये व उघड्या हवेत नसतात.
                RCC बांधकामातील लोखंडीसळ्या सिमेंट काँक्रीट आणि प्लास्टरच्या आत [७५-८५ मिमी.] पूर्ण झाकल्या गेलेल्या असतात. [तशा त्या असायलाच हव्यात]
                पण मग तरीही लोखंडीसळ्या गंजतात आणि स्ट्रक्चरची ताकद कमी होवून इमारतीचे आयुष्य कमी होते ही वस्तुस्थिती आहे.
                याची मुख्य कारणे कोणती ते शोधून काढून त्यावर उपाययोजना केली गेली तर इमारतीचे आयुष्य वाढणार हे नक्की. ही कारणे कोणकोणती व त्यावरील उपाय योजना कोणत्या ते पाहुया.
                RCC बांधकामामध्ये सिमेंट-काँक्रीट मिश्रणाचा लोखंडी बारच्या पृष्ठभागावर चिकटला जाणारा थर गंज प्रतिबंधक असतो. तसा तो असायला हवा.
                पण.......  RCC बांधकामामधील लोखंड ११ PH च्या खाली गंजप्रतिबंधक व सुरक्षित रहात नाही.
                मिश्रणाचा PH” ठरवते त्यामधील पाणी. म्हणूनच मिश्रणात वापरले जाणारे पाणी हा त्या बांधकामाचे आयुष्य वाढवण्यासाठी फार महत्वाचा घटक असतो. सर्व बांधकामांमध्ये हे पाणी वापरण्यापूर्वी साईटवरील प्रयोगशाळेत तिचे व्यवस्थित परीक्षण करूनच मग ते योग्य असेल तरच वापरले पाहिजे.
                दुसरी गोष्ट, बाह्य व अंतर्गत लिकेजकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्ट्रक्चरमध्ये पाणी साठत जावून जेव्हा रीएनफोर्सड सिमेंट-काँक्रीटमध्ये असलेल्या सळ्यांपर्यंत पोहोचते तेव्हां लोखंडी सळ्या मोठ्या प्रमाणात गंजायला [Oxidation] सुरुवात होते.
                या सर्व प्रोसेस दरम्यान त्या सळ्या फुगायला सुरुवात करतात आणि त्यांच्या पृष्ठभागावरचे पापुद्रे [Scaling] हळूहळू निघायला सुरुवात होते.
                या सळ्या गंजतांना [Oxidation] त्यांचे पृष्ठभागावरील आकारमान फुगण्या/वाढण्यामधील ताकद एव्हढी प्रचंड असते की ते बाजूच्या सिमेंट-काँक्रीटला दूर ढकलायला/सारायला सुरुवात करते. तिथे सुरुवातीला सूक्ष्म तडा निर्माण होतो. नंतर तो तडा वाढत जावून मोठा तडा निर्माण होतो व कालांतराने तेथील सिमेंट-काँक्रीटची ढलपी निघते.
                म्हणूनच लोखंडी सळ्या चांगल्या ग्रेडच्या व दर्जाच्या वापरल्या पाहिजेत शिवाय त्या गंजायला नको म्हणून योग्य अशा सर्व काळज्या घेतल्या पाहिजेत.
                सिमेंट-काँक्रीट मिश्रण श्वासोच्छ्वास [Concret Breaths] करते हे जरी खरे असले तरी वापरले गेलेले सिमेंट-काँक्रीट मिश्रण उच्च दर्जाचे, समान गुणधर्म असलेले व एकसंध असे असेल आणि शिवाय त्यावरील प्लास्टर गिलावा उच्च दर्जाच्या पेंट मटेरियलने व्यवस्थित आच्छादित केलेला असेल तर वातावरणातील समुद्राची खारट हवा त्या लोखंडी सळ्यांपर्यंत पोहोचू शकणार नाही. अर्थात यासाठी वेळोवेळची नीट देखभाल [Maintenance] फार आवश्यक.
                शिवाय कोणतेही रिपेअर काम किंवा अंतर्गत सजावटीच्या कामामधून अंतर्गत व बाह्य लिकेज-सिपेज याद्वारे पाण्याचा सूक्ष्मकण देखील त्या लोखंडीसळ्यांपर्यंत पोहोचला जाणार नाही ही काळजी सर्वतोपरी घेतली गेली पाहीजे.
                इमारतीच्या पृष्ठभागावर अगदी सूक्ष्म तडा सुद्धा येता नये. यदाकदाचित तडा निर्माण झालाच तर त्वरित काम करून तो बुजवला पाहिजे. इमारतीचा बाह्य पृष्ठभागावर म्हणजेच स्ट्रक्चर व भिंतींवर मजबूत प्लास्टर गिलावा करायचा असतो. त्या प्लास्टरचे आयुष्य पुष्कळ टिकावे म्हणून त्यावर बाह्य पेंटिंग करायचे असते.
                बहुतेक सभासदांचा असा गैरसमज आहे की इमारतीचे सौंदर्य वाढवण्यासाठी बाह्य पेंटिंग केले जाते. बाह्य पेंटिंग करण्यापाठीमागे इमारतीचे सौंदर्य वाढवणे हा हेतू दुय्यम असून इमारतीच्या प्लास्टर गिलाव्याचे आयुष्य वाढवणे हा मुख्य हेतू असतो. 
                म्हणून वेळोवेळी ठराविक काळाने इमारतीला चांगल्या दर्जाचा एकसंध व टिकावू असा बाह्य पेंट दिला पाहिजे.
                पेंटमुळे प्लास्टरच्या पृष्ठभागावरील सर्व बारीक छिद्रे, सूक्ष्म तडे बुजले जावून पावसाचे पाणी व बाष्प अजिबात आत जाणार नाही ही काळजी घेतली जाते. पेंट/मटेरियल त्या दृष्टीनेच निवडायला हवे.
                थोडक्यात पाणी वा हवेतील बाष्प लोखंडीसळ्यांपर्यंत अजिबात जाणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतली गेली तर त्या सळ्या गंजणार/सडणार नाहीत व इमारतीचे आयुष्य भरपूर वाढेल.
                तरीही भरपूर काळजी घेवूनही काही कारणाने बाह्य अथवा अंतर्गत लीकेजचे पाणी किंवा बास्पा-सहित खारी हवा त्या लोखंडीसळ्यांपर्यंत पोहोचून त्या गंजण्याची शक्यता उरतेच.
                यावर रामबाण उपाय हा की बांधकामात उच्च ग्रेडच्याच लोखंडीसळ्या वापरल्या पाहिजेत व त्या सर्व सळ्यांच्या पृष्ठभागावर प्रशिक्षित कारागिरांकडून योग्य पद्धतीने पॉलीमर, इपॉक्सी कोटींग, रसायनांचा थर लावूनच त्या वापरल्या पाहिजेत. यामुळे बाष्पसहित खारी हवा किंवा लीकेजचे पाणी सळ्यांपर्यंत जरी पोहोचले तरी त्या सळ्यांचा पृष्ठभाग गळतीप्रतिबंधक अशा खास कोटिंगने सुरक्षित असल्यामुळे पाणी/हवा त्यांच्या पृष्ठभागाला लागणार नाही व त्या अजिबात गंजणार/सडणार नाहीत. पर्यायाने बांधकामाची सुरक्षितता व आयुष्य अनेक पटींने वाढेल हे अगदी नक्की.
                हे सर्व काम नीट काळजी घेवून प्रशिक्षित कामगारांकडून योग्य देखरेखीखाली करून घेणे आवश्यक आहे. अशा कामांमुळे इमारतींचे आयुष्य १०० वर्षांपेक्षा नक्कीच... नक्कीच जास्त राहील.
                यावर काही व्यक्ती माझ्याकडे अशी भिती व्यक्त करतात की असे टिकावू व 
दर्जेदार काम करण्यासाठी प्रचंड बांधकाम खर्च येवू शकतो. त्यांची ही भिती देखील गैर आहे. सध्याचा बांधकाम खर्च २०००/-रुपये स्क़्वे. फुट आपण गृहीत धरला तर त्यामध्ये जास्तीतजास्त १५% टक्के जास्त खर्च म्हणजेच स्क्वे. फुटसाठी साधारण ३००/-रुपये फक्त एव्हढा जास्त खर्च करून दर्जेदार टिकावू काम नक्की करता येवू शकते.
                आवश्यकता आहे ती योग्य तज्ञ व अनुभवी व्यक्तीची आणि मुख्यत्वे ग्राहकाच्या व विकासकाच्या मानसिकतेची.
                मी स्वत: अमेरिकन काँक्रीट इन्स्टिट्यूटचा आजीवन सभासद आहे. जागतिक पातळीवर काँक्रीट संबंधित जे संशोधन सदैव केले जाते त्याचे अद्ययावत ज्ञान मी नेहेमी मिळवत असतो.
                शिवाय गेली अनेक वर्षे टिकावू व दर्जेदार बांधकाम संदर्भात स्वत:चे विशेष संशोधन वेगवेगळ्या साईटवर सातत्याने करून मी स्वत:च्या काही खास अशा पद्धती बांधकामांमध्ये रूढ करत आहे.
                गुजराथ, अहमदाबाद येथील भूकंपस्थळाला भेट दिल्यावर तेथील मालमत्तेचे नुकसान व विशेषत: जीवितहानी पाहून आणि एकंदरीत सर्व दृश्य पाहून मला अतिशय दु:ख झाले.
                समाजहित व समाजाप्रती स्वत:चे योगदान म्हणून भरपूर मेहेनत करून व संशोधन करून भूकंपामुळे होणारी मालमत्ताहानी व विशेषत: जीवितहानी पूर्ण टळावी म्हणून मी स्वत:चे एक खास तंत्रज्ञान विकसित केले आहे.
                ब्रिक-रीएनफोर्सड [Brick-Reinforced Technology] असे या तंत्रज्ञानाचे नाव मी ठेवले आहे. या तंत्रज्ञानाचे पेटंट्स मिळवण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते तंत्रज्ञान सर्व जगात विशेषत: भूकंपप्रवणक्षेत्रातील सर्व बांधकामांसाठी खुले करण्याचा माझा मानस व प्रयत्न आहे.
                भूकंप कुठेही, कधीही येवू शकतो. तो सांगून येत नाही आणि त्याला थांबवता वा अडवता येत नाही. जसे अहमदाबाद येथे नुकसान झाले तसे इतरत्र कुठेही होवू शकते.
                असा काही प्रकार मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये घडू नये. पण घडलाच तर मालमत्ता व जीवितहानी टळावी या हेतूने या तंत्रज्ञानाचा वापर महानगरांमध्ये अनिवार्य करावा यासाठी मी फार प्रयत्नशील आहे.
                ब्रिक-रीएनफोर्सड [Brick-Reinforced Technology] बद्धल थोडी माहिती माझ्या “सोप्पी ओळख बांधकाम-शास्त्राची” या पुस्तकात दिलेली आहे. या तंत्रज्ञानाबद्दल सचित्र, सविस्तर माहिती माझ्याच आगामी RCC [रीईनफोर्सड सिमेंट-काँक्रीट]: बांधकाम ताकद-टिकावू दर्जा या पुस्तकामध्ये देत आहे.
                रीएनफोर्सड सिमेंट-काँक्रीट या उच्च तंत्रज्ञानाबद्दल फार गैरसमज आहेत. अप्रशिक्षित व अकुशल कामगारांनी या तंत्रज्ञानाला स्वत:च्या मर्जीने वाटेल तसे वापरून त्याबाबत गैरसमज अजून वाढवून ठेवले आहेत.
                कामगारांना प्रशिक्षण देण्याबाबत आजही गांभीर्याने विचार होतांना दिसत नाही. आम्ही मात्र जमेल तसे छोट्या प्रमाणावर का होईना पण कामगार प्रशिक्षणाचे काम सातत्याने करत आहोत. आगामी पुस्तकांमध्ये या सर्व बाबींवर मी प्रकाश टाकत आहे.
मुंबईतील खाऱ्या हवेमध्ये बांधकामाचे
३५-४० वर्षे आयुष्य म्हणजे खूप होय
असे समजणाऱ्या बिल्डर्ससाठी व
पुनर्विकासामधील ग्राहकांच्या
माहितीसाठी...........


इमारतीचे आयुष्य अनेक पटीने वाढवायचे आहे???
साईटवरील पूर्ण एक्झिक्युशन, कामगार प्रशिक्षण,
रासायनिक ट्रीटमेंटसची जबाबदारी या सर्वासाठी...
यश इन्फ्रास्ट्रक्ट

Contact
Call: 92234 19450,    SMS: 73030 55782.

No comments:

Post a Comment